“भविष्यात उद्धव ठाकरेंना तुरुंगात मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची वेळ येऊ शकते”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेऊन सत्तेच्या मोहापायी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.त्यांच्या सरकारमधील मंत्री एकेक करून तुरुंगात जात आहेत, भविष्यात ठाकरे यांना तुरुंगात जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची वेळ येऊ शकते, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग यांनी गुरुवारी केली. आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने चुग हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

महाराष्ट्रातील सरकारवर टीका करताना चुग म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी घात करून हे सरकार स्थापन झाले आहे. आज शिवसेनाप्रमुख असते तर दु:खी झाले असते. सरकारचे अनेक घोटाळे, वसुलीची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे या सरकारपासून लाेकांना सुटका हवी आहे. या षडयंत्री सरकारमधील काही मंत्री तुरुंगात गेले असून काही जण जातील, असे भाकीत चुग यांनी केले. ठाकरेंना तुरुंगात मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागेल.

म्हणजे याचा अर्थ आगामी काळात राज्यात काही घडणार आहे की, हे भाकीत काल्पनिक आहे? यावर चुग म्हणाले, सरकारच्या कर्मामुळे त्यांच्यावर तशी वेळ येईल. केंद्र शासन ईडीचा गैरवापर करून राज्यात कारवाईचे षडयंत्र रचत असल्याच्या प्रश्नावर ईडीचा गैरवापर सरकार करीत नसल्याचा दावा त्यांनी केला. मध्य प्रदेशसारखे ऑपरेशन लोटस राज्यात वापरून सत्ता ताब्यात घेणार काय, यावर चुग यांनी गोलमाल उत्तर दिले. या वेळी आ. अतुल सावे, प्रवीण घुगे, बसवराज मंगरूळे, शहराध्यक्ष संजय केणेकर, मयूर वंजारी, दीपक ढाकणे, डॉ.राम बुधवंत, राजेश मेहता आदींची उपस्थिती होती.

Team Global News Marathi: