नवी दिल्ली | केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे तब्बल ३ हजार ६२३ कोटी रूपयांचं उत्पन्न असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील १ हजार ६५१ कोटी रूपये भाजपने खर्च केले असल्याची माहिती भाजपने निवडणूक आयोगाला दिली आहे. २०१९ -२० च्या आर्थिक रिपोर्टनुसार भाजपकडे २०१८-१९ मध्ये २ हजार ४१० कोटीचं उत्पन्न झालं होतं. त्यामुळे एका वर्षात भाजपच्या उत्पन्नात ५० % टक्यांनी वाढ झाली आहे.
निवडणूक आयोगाला मिळालेल्या माहितीनुसार, २०१९-२० मध्ये इलेक्ट्रीकल बाॅन्डच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात २ हजार ५५५ कोटी रूपये जमा झाले आहेत. तर २९१ कोटी रूपये हे वैयक्तिक देणगीच्या स्वरूपात भाजपला मिळाले आहेत. गेल्या दोन वर्षाचा आर्थिक आलेख पाहता भाजपचा खर्च सरासरी उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाला देखील २०१९-२० मध्ये ६८२ कोटीचं उत्पन्न झालं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भाजपने काँग्रेसपेक्षा ५.३ पटीने जास्त कमाई केली आहे. तर भाजपने काँग्रेसच्या तुलनेत १.६ पटीने जास्त खर्च देखील केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजपने फक्त जाहिरातींसाठी ४०० कोटीचा खर्च केला आहे. त्यात इलेक्ट्राॅनिक मीडियावर २९३ कोटी खर्च केले आहेत.