भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये – संजय राऊत

 

मुंबई | गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांची मतमोजनी सुरू आहे. त्यामुळे सत्ता कोणाची? याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी भाष्य केले आहे. ते आज मुंबई येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येईल आणि गुजरातमध्ये सर्व विरोधक एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच दिल्लीत आपला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करताना राऊत म्हणाले, दिल्ली महानगरपालिकेत मिळालेल्या यशासाठी मी आपचे अभिनंदन करतो. हिमाचल प्रदेश लहान राज्य असले तरी तेथे काँग्रेस ज्या पद्धतीने लढत आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे लागेल. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असेच लोकांना वाटते. देशाच्या पुढील निवडणुकींसाठी हे आशादायक चित्र आहे, असे संजय राऊत म्हणाले.

पुढे राऊत म्हणाले, फक्त विरोधकांनी एकत्र येणे आणि मतविभागणी टाळणे गरजेचे आहे. आपआपसातील मतभेद, हेवेदावे, अहंकार दूर ठेऊन एकत्र लढाई केली तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे हे निकाल आहेत. सगळे एकत्र येऊन लढले तर गुजरातमध्येदेखील लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होईल. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये असे मला वाटते.

राऊत म्हणाले की, राहुल गांधी वेगळ्या मिशनवर आहेत. या निवडणुकीचा संदर्भ त्यांच्या यात्रेशी जोडणे हे चुकीचे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेस अंतर्गत आणि इतर राजकारणापासून राहुल गांधी दूर आहेत. ते एक वेगळी मोहिम पुढे नेत आहेत. देश जोडणे, देशातील द्वेष नष्ट करणे, लोकांची मने जोडणे, संघर्ष थांबवणे यासाठी ते भारत जोडो यात्रा करत आहेत. त्या यात्रेला चांगले यशही मिळत आहे. त्यामुळे त्या यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडणे मला पटत नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष आणि इतर लोकांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यांच्याशी या निकालाचा संबंध जोडला जाऊ शकतो, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: