भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; शरद पवारांनी रुबी हॉस्पिटल जाऊन केली तब्येतीची विचारपूस

पंढरपूर, 27 नोव्हेंबर :  पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय भारत भालके यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.

दरम्यान,  ‘आमदार भारत भालके यांची प्रकती अतिशय नाजूक आहे, पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे.  आम्ही लक्ष ठेऊन आहोत’, अशी माहिती रूबी हॉस्पिटलचे  डॉक्टर परवेझ ग्रँट यांनी दिली.

भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांची 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर पाच दिवसांनी 4 नोव्हेंबर रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ते घरी सुद्धा आले होते. पण काही दिवसांनी पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना मागील आठवड्यात पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, गुरुवारपासून त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना किडनीचा आजार आणि मधुमेहाचा त्रास आहे.

 


भारत नाना लवकर बरे होऊन त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यात कार्यकर्ते व नेते देवाला प्रार्थना करत आहेत. त्यांचे धाकटे बंधू पंजाबराव भालके यांनी देखील नाना बरे होण्यासाठी विठ्ठलाच्या चरणी साकडे घातले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: