भंडारा दुर्घटना: काय घडले, कसे घडले…? वाचा सविस्तर-

भंडारा दुर्घटना: काय घडले, कसे घडले…?

भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. वॉर्डातील तसेच शेजारच्या वॉर्डातील बाळांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम केले. यामुळे ७ बाळांना वाचवणे शक्य झाले. दुर्घटनेत १० बाळांचा मृत्यू झाला. यापैकी ३ बाळांचा आगीत होरपळून तर उर्वरित ७ बाळांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बाळांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दुर्घटनेत मृत्यू झालेली बालकं एक ते तीन महिने वयोगटातील होती. वजन कमी असणे, प्रकृती नाजूक असणे या कारणामुळे बाळांवर उपचार सुरू होते आणि त्यासाठीच त्यांना सिक न्यू बॉर्न बेबी केअर युनिट येथे ठेवले होते. या वॉर्डमध्ये मध्यरात्री आग कशी लागली याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोषींवर कारवाई होणार आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात मदत कार्य सुरू आहे. रुग्णालयाला आग लागल्यानंतर अनेकांना पर्यायी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत गरोदर तसेच प्रसूती झालेल्या महिला, नवजात अर्भकं आणि रुग्णांना त्रास होऊ नये आणि त्यांच्या वैद्यकीय देखरेखीत तसेच उपचारांमध्ये हयगय होऊ नये यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जात आहे.

मध्यरात्री २ च्या सुमारास घडली घटना

सदर घटना ही मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. एका नर्सला नवजात शिशु केअर युनिटमधून धूर निघत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या नर्सने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचा लोट तोंडावर आला, त्यामुळे त्यांना देखील काही दिसले नाही. त्यानंतर नर्सने त्वरित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आणि अग्नीशमन दलाला बोलावण्यात आले.

७ बालकांना वाचवण्यात आले यश

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये १७ बाळांना ठेवले होते. यापैकी १० बाळांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. पण ७ बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे धावपळ करुन ७ बाळांना वाचवले. युनिटमध्ये १७ पैकी १० बाळांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागली आणि दुर्घटना घडली. या प्रकरणी चौकशी होणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते व महामार्ग निर्मिती आणि बंदर विकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला

ग्लोबल न्युज नेटवर्क: