बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी भाषिक उमेदवार शुभम शेळके यांना १ लाख २४ हजार मते !


बेळगाव : भाजपचे दिवंगत केंद्रीयमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत सुरेश अंगडी यांच्या पत्नी व भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा अखेरच्या टप्प्यात विजय झाला आहे. या विजयामुळे भाजपाला आपला गड राखण्यात यश मिळाले आहे. मात्र शेवटपर्यंत अटीतटीच्या होत असलेल्या सामन्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा 2 हजार 903 मतांच्या फरकाने पराभव झाला. मात्र या निवडणुकीत शुभम शेळके याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.


मंगला अंगडी यांना एकूण 4 लाख 35 हजार 202 मते मिळाली, तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना 4 लाख 32 हजार 299 मते मिळाली. सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी तब्बल 1 लाख 24 हजार 642 मते घेत सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये पुन्हा एकदा एकीचा विश्वास निर्माण केला आहे.
मंगला अंगडी यांना माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या गोकाक मतदारसंघात 26 हजार 826, बेळगाव दक्षिणमध्ये 22 हजार 857 मतांची मिळालेली आघाडी सतीश जारकीहोळी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.


गेल्या लोकसभेपेक्षा या निवडणुकीत भाजपच्या मतात घट झाली आहे. 15 हजार 743, बेळगाव उत्तरमध्ये 12 हजार 759 आणि सौन्दत्तीमध्ये 16 हजार 559 मतांची आघाडी मिळवत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी शेवटपर्यंत जोरदार टक्कर दिली. बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील आर.पी.डी. कॉलेज येथे आज मतमोजणी झाली. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेसाठी शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांच्या शुभम शेळके या उमेदवाराने लढत दिली. निवडणुकीत सिंह हे चिन्ह मिळालेल्या शुभम शेळके यांनी प्रचारातून साम, दाम, दंड, भेद विरोधात डरकाळीच फोडली होती. तब्बल सव्वा लाख मते घेऊन शुभमने दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना घाम तर फोडलाच, शिवाय पुन्हा एकदा सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये विश्वास निर्माण केला.

Team Global News Marathi: