बारावीचा आज निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार

 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज (8 जून) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण पाहता येतील तसेच सदर माहितीची प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेजमार्फत 17 जून रोजी दुपारी 3 वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी दिली.

 

ऑनलाइन निकालानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे 10 जूनपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यी https://verification.mh-hsc.ac.in या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जून, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यी ऑनलाइन पद्धतीने शुल्कदेखील भरू शकतात.

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. नापास विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार असून त्यासाठी 10 जूनपासून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

Team Global News Marathi: