कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल आहे. जर पैसे दिले नाहीत तर बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी या महिलेने दिली आहे. या महिलेने आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन धनंजय मुंडे यांना फोन करुन धमकी दिली. या महिलेकडून फोन कॉल येऊ लागल्या, त्यासोबतच या महिलेने मंत्री धनंजय मुंडे यांना धमकावत म्हटलं की, 5 कोटी आणि महागडा मोबाइल दिला नाही तर सोशल मीडियात बदनामी सुद्धा करेन.
यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी या महिलेच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन फोन केले होते. यावेळी या महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपये आणि महागडा मोबाइल फोन देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात आता मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.