बलात्कार, गर्भपात, धमकी देणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यास अटक

 

बलात्कार , गर्भपात, धमकावणे व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमां खाली गुन्हा दाखल झाल्यावर फरार असलेला भाजपाचा पदाधिकारी नवीन सिंह ह्याला काशीमीरा पोलिसांनी पालघरच्या चारोटी येथून अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने बुधवारी त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .

२५ वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादी वरून १४ सप्टेंबर रोजी भाजपाच्या सृष्टी मंडळचा पदाधीकारी असलेल्या नवीन सिंह याच्यावर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पती पासून मुलीसह विभक्त राहणाऱ्या पीडितेला नवीन याने त्याच्या कार्यालयात कामास ठेवले तसेच रहायला फ्लॅट दिला. मुलीची व तिची जबाबदारी घेतो सांगितले . त्यातूनच दोघां चे शारीरिक संबंध झाले .

ती गरोदर राहिली असता बळजबरी गर्भपात त्याने करायला लावला . नगरसेवकांच्या निवडणुकी नंतर लग्न करू असे आश्वासन दिले असले तरी तो इच्छे विरुद्ध बळजबरी करायचा. अन्य महिले वरून दोघात वाद झाला होता . तिचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र तिच्या परिचितास पाठवून ते समाज माध्यमांवर व्हायरल करायची धमकी त्याने दिली होती. गुन्हा दाखल झाल्या नंतर नवीन हा पसार झाला होता . काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके नवीन याचा शोध घेत होती .

Team Global News Marathi: