शिंदे आणि अमित शाह यांची मध्यरात्री खलबतं? कोणत्या विषयावर होणार चर्चा

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीतील मुक्काम एका दिवसाने वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि वेदांता-फॉक्सकॉन वादाच्या मुद्यांवर ही चर्चा झाली असल्याचा कयास बांधण्यात येत आहे. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह शिंदे गटातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची याचा वाद आता निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपला दावा मजबूत करण्यासाठी शिंदे गटाने इतर राज्यातील शिवसेना पदाधिकारी आपल्याकडे ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत बुधवारी शिंदे यांनी बैठक घेतली.

मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायती निवडणुक निकालात शिंदे गटाला अपेक्षित यश मिळाले नसल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने शिंदे गट आणि भाजप यांच्याशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. तर, राज्यात काही ठिकाणी शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये राडादेखील झाला.

Team Global News Marathi: