बच्चू कडू अन् रवी राणा वादात एकनाथ खडसेंची थेट मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

 

शिंदे आणि फडणवीस सरकारला समर्थन देणाऱ्या दोन आमदारांमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. या खोक्यांच्या वादात आता एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे. एकनाथ खडसे यांनी खोक्यांच्या आरोपावरून खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, की बच्चू कडू यांनी खोके घेतले की रवी राणा यांनी खोके घेतले याचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील. कारण खोके देणे किंवा घेण्याचा व्यवहार एकनाथ शिंदे यांच्या हातातून झाला असल्याचं दिसतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यातील वस्तुस्थिती एकनाथ शिंदे, आमदार बच्चू कडू किंवा रवी राणा यांनाच माहिती असेल, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. एकनाथ खडसे हे सध्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात सध्या मोठा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

सध्या या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती आरोप केले आहेत. गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडूंवर केला होता. यानंतर आमदार रवी राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार केली आहे.

 

Team Global News Marathi: