बाप काढल्यानंतर शिंदे आक्रमक, थेट दाऊदचं नाव घेत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाच दिले चॅलेंज

 

एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी चिघळताना दिसून येत आहे. शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन सुरु असतानाच शरद पवारही सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी बाप काढल्यानंतर एकनाथ शिंदे झाले आणखी आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. शिंदे यांनी थेट ट्विटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. संजय राऊतांच्या जहरी टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे यांचे ट्विट अत्यत स्फोटक असून हा बंडखोर गट माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते.? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.. मरण जरी आलं तरी बेहत्तर हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू… अशा आशयाचे ट्विट शिंदे यांनी केले आहे.

 

शिंदे यांनी या ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या कथीत मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपांमध्ये जेल मध्ये आहेत. या ट्विट्च्या माध्यमातून शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईबाबत भाष्य केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडावी आणि भाजपाबरोबर सत्ता स्थापन करावी अशी मागणी एकनाथ शिंदेच्या या बंडखोर गटाकडून करण्यात येत आहे.

Team Global News Marathi: