अविनाश भोसले यांच्या सुनावणीकडे लक्ष; आज न्यायालयात करणार हजर

 

मुंबई | येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. माध्यमातून करण्यात आलेल्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एबीएल ग्रुपचे अध्यक्ष अविनाश भोसले यांच्या कोठडीवर आज विशेष सीबीआय न्यायालय सुनावणी होणार आहे. आता या सुनवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एबीआयएल) अविनाश भोसले यांच्यासह विनोद गोयंका, शाहिद बलवा, राजकुमार कंदस्वामी आणि सत्यान टंडन यांच्याशी संबंधित बांधकाम कंपन्यांनी येस बँकेच्या कर्जाचे पैसे लुटण्यासाठी वाधवान बंधूंना मदत केल्याचा सीबीआयला संशय आहे. अविनाश भोसले यांनी गैरव्यवहारातील २९२ कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा आरोप आहे.

दोन कंपन्यांमार्फत ती रक्कम वळवण्यात आली असून त्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सीबीआयने भोसले यांच्या कोठडीची मागणी केली आहे. त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्यांच्या वकिलांनी कोठडीला विरोध केला होता. त्या संदर्भात त्यांनी, विशेष सीबीआय न्यायालयात अर्जही दाखल केला आहे.

या अर्जावर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने सीबीआयला ३० मे पर्यंत मुदत दिली असून, तोपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी भोसले यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Global News Marathi: