“औरंगाबादच्या नामांतराचे गाजर दाखवून समस्यांपासून लोकांचं लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळवण्याचा पोरखेळ”

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने होणाऱ्या ‘हिंदुत्वाचा हुंकार’ या घोषवाक्यासह मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार केला आहे. या सभेवरून भाजपाने मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. “औरंगाबादच्या नामांतराचे गाजर दाखवून समस्यांपासून लोकांचं लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळविण्याचा पोरखेळ” असं म्हणत निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मतदारांचा आणि सामान्य शिवसैनिकांचा विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद बळकावलेल्या उद्धव ठाकरे यांची अडीच वर्षांनंतरची दुसरी सभा संभाजीनगरला होणार आहे. या सभेत ते या शहराचे संभाजीनगर असे नामांतर करणार अशा आश्वासनाचे गाजर सैनिक दाखवू लागले आहेत. मुळात मुख्यमंत्र्यांना असा निर्णय घेण्याच गेल्या अडीच वर्षात जमले नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पण त्याहून महत्वाचे म्हणजे, नामांतराचे गाजर दाखवून औरंगाबादच्या मुख्य समस्यांपासून नागरिकांचे लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळविण्याचा नेहमीचाच पोरखेळ पुन्हा ते खेळतील अशी हवा तयार केली जात आहे” असं म्हटलं आहे.

“औरंगाबाद शहराला पाणीटंचाईची समस्या सतत भेडसावत आहे. केवळ बैठका घेऊन आणि कागदी आदेश देऊन हा प्रश्न सुटणार नाही. शहरातील रस्त्यांची दुर्दशा, औद्योगिक वसाहतीतील सुविधांचा अभाव, दहशत, खंडणीखोरी या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष वळवायचे आणि प्रत्यक्षात काहीच करायचे नाही ही ठाकरेंच्या कारभाराची तऱ्हा महाराष्ट्र अडीच वर्षांपासून अनुभवत आहे. त्यामुळे आजच्या सभेत केवळ गाजरे उधळण्यापलीकडे काहीही होणार नाही.”

Team Global News Marathi: