काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस नेतृत्वांनी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष पदाचा पुढचा दावेदार कोण असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला होता. मात्र यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
पुण्यात शरद पवारांना या बद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ते म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षपद ही काँग्रेसची जागा आहे. विधानसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री या जागा पक्षाच्या असल्या तरी सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची एक पद्धत आहे” असे शरद पवार म्हणाले.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगणार अशी सुद्धा चर्चा सुरु झाली होती मात्र या चर्चा चुकीच्या असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी नाना पटोले यांनी गुरुवारी संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.