अशोकराव, आम्ही सुद्धा ९६ टक्केवाले, खासदार छत्रपती संभाजीराजेंनी लगावला टोला

 

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीउपस्थितांना संबोधित करताना, काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात अनेक जिल्ह्यात आंदोलनं झाली, त्यावेळी त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला. नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले, पण संभाजीराजेंना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता” असा घणाघात संभाजीराजेंनी केला.

अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा ९६ टक्के वाले मराठे आहोत, असं म्हणत संभाजीराजेंनी अशोक चव्हाणांवर कडाडून टीका केली. आज मराठा मोर्चाचे आयोजन होणार असल्याची कल्पना असताना सुद्धा अशोक चव्हाण हे उपस्थित न राहिल्यामुळे राजेंनी यावेळी संताप व्यक्त केला होता.

प्रकाश आंबेडकर आमच्या आंदोलनात आले, त्यांचं कौतुक …! गरीब मराठ्याला न्याय द्यावा ही तुमची भूमिका. देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ. हेच या सरकारने सांगितले त्यामुळे शोषित वंचितांना आरक्षण मिळालेच पाहिजे , असं संभाजीराजे म्हणाले.

यावेळी राजेंनी पहिल्यांदाच थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकांनी बसावं माझ्यासमोर, होऊन जाऊ द्या चर्चा, असं आव्हानच खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलं आहे. या मोर्चाला संबोधित करताना संभाजी छत्रपती यांनी हे आव्हान दिलं. केंद्राने १२७ वी घटना दुरुस्ती केली आहे. राज्याला ओबीसी प्रवर्ग ठरवीण्याचे अधिकार दिल्याचं केंद्राने सांगितलं. आरक्षण देण्याचे अधिकार दिले. पण आरक्षण द्यायचं कुठून? इंदिरा सहानी केसने हात बांधले आहेत. त्याला एकच पर्याय आहे, आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही घटना दुरुस्ती केली पाहिजे.

Team Global News Marathi: