मुंबई | मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर ड्रग्ज पार्टीवर कारवाई करत एनसीबी’ने आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेतलं आहे. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाचा आर्यन खान याचा देखील समावेश आहे. या वृत्तामुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच एनसीबीने केलेल्या या कारवाईत अनेक बड्या उद्योगपतींच्या मुलींचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने १० जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यामध्येच वानखेडे यांनी आर्यनला ताब्यात घेतल्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
“आर्यन खान, मुनमून धमेचा,इस्मीत सिंग,विक्रम छोकेर,अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल या सगळ्यांची सध्या क्रुझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणी चौकशी सुरु आहे”, असं म्हणत समीर वानखेडे यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.अरबाज मर्चंट हा आर्यन खानचा जवळचा मित्र आहे अशी माहिती समोर येत आहे.