“सेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात दोन हजार वऱ्हाडी”

 

पुणे | राज्यात एकीकडे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सणांवर बंदी घातलेली असताना मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी नियम धाब्यावर बसवून कार्यक्रम करताना दिसून येत आहे. त्यातच पुण्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात करोना प्रतिबंधक नियमांना पायदळी तुडवण्याचा प्रकार समोर आहे.

या प्रकरणी आता जुन्नर पोलिसांकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य देवराम लांडे यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लग्नसोहळ्यासाठी फक्त २०० लोकांची परवानगी असताना तब्बल दोन हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडल्याचं समोर आलं आहे. शनिवारी म्हणजेच २८ ऑगस्टला हा विवाह सोहळा पार पडल्याची माहिती मिळत आहे. यामुळे, पुन्हा एकदा शिवसैनिकच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फसतात अशी टीका होऊ लागली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असताना देवराम लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तर आता ते शिवसेनेत आहेत. दरम्यान, लांडे यांनी या प्रकरणी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. “मी दोनशे लोकांची परवानगी घेतली होती. पण मी लोकांच्या गळ्यातील ताईत आहे. मी त्यांच्या लग्नाला जात असल्याने ते देखील माझ्या मुलाच्या लग्नाला आले. मला नियम तोडायचे नव्हते”, असं लांडे म्हणाले. दरम्यान, २ स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर आता जुन्नर पोलीस लग्न कार्यालय देखील सील करण्याच्या दिशेने कारवाई करण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: