शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारून अनेक महिने लोटले तरी याचा खुद्द या शिवसेना खासदाराला विसर पडलेला दिसून येत आहे. शिवसेना सचिव आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं आहे. मात्र आता सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय.
प्रकरण असे की, खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील कोल्हापूर सिंधुदुर्ग जोडणारा आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी आले होते. आंजिवडे येथे मीडियाशी बोलताना राऊत यांनी आघाडी सरकार मधील काँग्रेसचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा उल्लेख चक्क राज्याचे मुख्यमंत्री म्हणून केला.
सध्या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आहे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी आघाडी झाली आहे. या आघाडीतील प्रत्येक मंत्री आमदार खासदार हे एकमेकांवर संधी मिळेल तेव्हा कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. बऱ्याच वेळा बोलताना ओघामध्ये कुठल्या पक्षाचा कोणता मंत्री आहे, त्याकडे कोणते पद आहे, याचंही भान नेत्यांना राहत नाही. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता.