अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व, काँग्रेस नेत्याने उडवली खिल्ली |

 

महाराष्ट्र राज्य सहकार बँक कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी, ईडीने मोठी कारवाई केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आणि त्यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्याशी संबंधित, साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवर भाष्य करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

“अजित पवारांचं नाव आत्ता आलं. आम्ही तर कधीपासून त्याबाबत बोलतोय. आता ईडीने लक्ष घातल्यावर सगळं काही बाहेर पडेल”, अशी तिखट प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली होती. हजारे यांच्या या प्रतिक्रियेवर काँग्रेस नेत्यांनी टीका करून अण्णा हजारे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

आमच्या सरकारने फडणवीस सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर पुराव्यानिशी बाहेर काढले. तेव्हा अण्णा हजारेंची निद्रावस्था भंग झाली नाही. राफेलच्या आवाजाने, शेतकऱ्यांच्या आक्रोशाने, महागाईच्या वणव्यानेही ते ढिम्म हलले नाहीत,” असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच, “राज्यातले सरकार बदलले आणि आता कुठे आमच्या काळात, अण्णा ७ वर्षांच्या कुंभकर्णीय निद्रेतून खडबडून जागे झाले आहेत,” अशी देखील टीका त्यांनी केली आहे.

त्याच प्रमाणे दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात अण्णा हजारे उपोषणाला बसणार होते. पण विरोधी पक्षनेते फडणवीसांनी त्यांची भेट घेऊन, त्यांचं मन वळवलं आणि ते बसले नाहीत. तेव्हापासून हजारे भाजपच्या टीमचा भाग आहेत, असा त्यांच्यावर आरोप होत आहे. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहेत,” अशी टीका काँग्रसे नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.

Team Global News Marathi: