अनिल परबांचा सदाभाऊ खोतांवर गंभीर आरोप, त्यांनी बाहेर येऊन वेगळच सांगितलं !

 

मुंबई | मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठीचं आंदोलन चांगलंच लावून धरलेलं आहे. राज्यातल्या विरोधी पक्षानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चाही केली. त्यानंतर आज अनिल परबांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. चर्चा वेगळी केली आणि बाहेर येऊन वेगळं सांगितलं, असं परबांचं म्हणणं आहे.

संपाविषयी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं तसंच आपण कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, असंही सांगितलं. एसटी विलिनीकरण हे दोन-चार दिवसांत शक्य नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागेल. पण आपण कर्मचाऱ्यांशी चर्चेसाठी तयार आहोत, असंही परब यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

परब म्हणाले, “मी वारंवार आवाहन करत आहे की, नागरिकांची गैरसोय होत आहे त्यामुळे संप मागे घ्या. तुमच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. विलिनीकरणाचा निर्णय दोन-चार दिवसांत घेण्यासारखा नाही. त्यामुळे आपण चर्चा करुया आणि एकत्र त्यातून मार्ग काढूया. मी काल सदाभाऊ खोतांशी चर्चा केली. त्यांना या सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या. पण त्यांनी बाहेर येऊन काहीतरी वेगळंच सांगितलं. मी विरोधी पक्षनेत्यांशी चर्चेलाही तयार आहे. पण त्यांच्या मनात काय आहे हे माहित नाही. हे आंदोलन जितकं चिघळेत तेवढं आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटीचं नुकसान होईल आणि परिणामी एसटी कर्मचाऱ्यांचंही नुकसान होईल”.

Team Global News Marathi: