अनिल देशमुख यांना झटका, पुन्हा ईडी कोठडीत रवानगी होणार

 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक झटका बसला आहे. काल सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निर्णयाला ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची पुन्हा ईडी कोठडीत रवानगी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

काल अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनिल देशमुख यांना १ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

१०० कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. १२ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. १०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती.

Team Global News Marathi: