नगर जिल्हा रुग्णालयात आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश

 

नगर जिल्हा रुग्णालयात आज सकाळी आग लागून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 6 जणांवर उपचार सुरु आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. प्राथमिक चौकशी आणि माहितीनुसार प्रथम रुग्णालयातील एसीला आग लागली, ती आटोक्यात आणण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे काही रुग्णांचा गुदमरुन तर काहींचा दुसरीकडे स्थलांतरीत करत असताना मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी एसीमध्ये लागलेल्या आगीमुळे संपूर्ण अतिदक्षता विभाग जळून खाक झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी खास कोरोना कक्ष तयार करण्यात आला होता. रुग्ण वाढू लागल्याने त्याचे अतिदक्षता विभागात रुपांतर करण्यात आले.नाशिक गॅस दुर्घटनेनंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. तरीही ही दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या विभागात १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, या विभागातील एसीला आग लागली. ती लक्षात आल्यावर हालचाली सुरु झाल्या. परंतु ऑक्सिजन बंद केल्याने आणि तोपर्यंत धूर आणि आग पसरल्याने एकच गोंधळ उडाला.रुग्णांना तातडीने दुसरीकडे स्थलांतरित करण्यास सुरुवात झाली. हे सुरु असताना आग भडकली आणि आत प्रवेश करणे अवघड झाले, अशी घटनेबाबत प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आणि मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले.

Team Global News Marathi: