मुंबई | राज्यात पोलीस बदल्यांसाठी सह्याद्री अतिथीगृहासह ज्ञानेश्वरी बंगल्यात गुप्त बैठका झाल्याचा खळबळजनक आरोप करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब हे बदल्यांच्या लिस्ट फायनल करीत असल्याचे अनिल देशमुख यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रवी व्हटकर यांनी ईडीकडे दिलेल्या जबानीत म्हटले आहे.
हा खळबळजनक दावा करणारे कार्यकारी अधिकारी रवी व्हटकर हे अनिल देशमुख यांचे विशेष कार्यकारी अधिकारी असल्याने त्यांच्या जबानीमुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या टार्गेटचे आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती.
या आरोपानंतर त्याची ईडीकडून स्वतंत्र चौकशी सुरु झाली होती. याच गुन्ह्यांत आतापर्यंत परमबीर सिंगसह अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकासह इतरांची ईडी जबानी नोंदवून घेतली होती. याच प्रकरणात रवी व्हटकर यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. रवी हे अनिल देशमुख यांचे विशेष कार्यकारी अधिकारी असल्याने त्यांच्या जबानीला विशेष महत्व होते.
आपल्या जबानीत त्यांनी बदल्यांचा निर्णय आधीच घेतला जात होता. सह्याद्री अतिथीगृहासह ज्ञानेश्वर बंगल्यात अनेकदा गुप्त बैठका होत होत्या. या बैठकीत अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्याकडून बदल्यांची फायनल लिस्ट ठरली जात होती. पोलीस आस्थापन मंडळ हे केवळ नावापुरते होते असा खळबळजनक आरोप त्यांनी लगावला होता.