अनेक नेते भाजपमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत, गिरीष महाजन यांचे सूचक विधान

 

सध्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकार पडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यातच ठाकरे गटाकडून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहे, असे विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले होते. अशातच आता नांदेड येथे माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनीदेखील यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

महाजन म्हणाले, राज्यभरातले अनेक नेते भाजमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत आणि संपर्कातही आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, आता मी नाव कोट करणार नाही. फक्त या जिल्ह्यातलेच नाहीत तर महाराष्ट्रातून अनेक लोक, बडे मंडळी आपल्या पक्षाचे भवितव्य काय हे, ज्यांना कळते त्यांना बऱ्याच जणांना भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले.

दरम्यान, काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याच नांदेड जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी वक्तव्य केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. फक्त याच जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून नेते संपर्कात आहेत, असे म्हटल्याने भाजप आता काँग्रेसला खिंडार पाडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याआधी जयंत पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथील अधिवेशन संपल्यानंतर शिंदे सरकार कोसळणार, असे भाकीत केले होते. यामुळे राज्यात आता शिंदे सरकार कोसळण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर पकडला आहे.

Team Global News Marathi: