आंदोलकांना बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल, तर पोलिसांना शरम वाटली पाहिजे

 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये आज होत असलेल्या माती परीक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. यावेळी विरोध करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी निषेध केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, बारसू सोलगाव रिफायनरी आंदोलनासाठी जाणाऱ्या स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांना राजापूर पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या दडपशाहीला न घाबरता यापुढेही स्वाभिमानी आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी ठाम राहील. बारसूमध्ये पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

तसेच राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांवर बेशुद्ध होईपर्यंत लाठीचार्ज केल्याचा आरोप केला. लोकशाहीच्या राज्यामध्ये आंदोलकांना बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल, तर पोलिसांना शरम वाटली पाहिजे. आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन करतो आपण रत्नागिरीला जाऊ आणि बारसूच्या शेतकऱ्यांना वाचवू, बघू यांच्याकडे किती पोलीस आहेत, किती लाठ्या आहेत आणि किती गोळ्या आहेत. सरकारने आता शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी दाखवावी.

, बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे ते आंदोलनावर ठाम आहेत. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. दरम्यान, बारसूमध्ये आंदोलकांच्या भेटीसाठी जात असलेल्या खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Team Global News Marathi: