महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावरून केलेल्या विधानानंतर राज्यात राष्ट्रवादीविरुद्ध मनसे असा वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका त्यांचा खाज ठाकरे म्हणून उल्लेख केला. तसेच इस्लामपूर सभेत मिटकरींनी हनुमान चालीसेचं भाषणात पठण करून दाखवलं. मात्र हे करताना त्यांनी हिंदू धर्मातील कन्यादान प्रथेवर भाष्य केले.
अमोल मिटकरींच्या वादग्रस्त विधानानंतर ब्राह्मण संघटनांनी त्यांना विरोध केला. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन केले. अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या वक्तव्यावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत मिटकरी यांनी केलेले वक्तव्य हे एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच मिटकरी यांचं ते व्यक्तिगत भाष्य होतं, राष्ट्रवादी म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मिटकरी यांच्या वादग्रस्त विधानावरून हात वर केले आहेत. जात पात धर्म हे आमच्या अंगाला देखील शिवले नाही. ते जे बोलले ते वैयक्तिक बोलले, मिटकरी याबाबत स्वतः स्पष्टीकरण देतील असंही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.