अमित शाह आणि गिरीश महाजन यांच्यात खलबतं, ट्विट करून महाजनांनी दिली भेटीची माहिती !

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटायला आला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. विशेष मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीवारी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र भेटीची वेळ मिळू शकलेली नाही, असे सांगितले जात आहे.

शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. अमित शाह यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र व्यस्त कार्यक्रमात अचानक गिरीश महाजनांना भेटण्यास अमित शाह यांनी होकार दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खुद्द गिरीश महाजन यांनी या भेटीची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. विविध विषयांवर मुख्यतः नाशिक व जळगाव जिल्ह्यातील विषयांवर चर्चा केली, असे गिरीश महाजन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच अमित शाह यांच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. अमित शाह यांच्याकडे सहकार खाते आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ राज्य सरकारने बरखास्त केले. तिथे भाजपचे आमदार आणि गिरीश महाजन यांचे समर्थक मंगेश चव्हाण यांना प्रशासक मंडळाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले.

Team Global News Marathi: