अक्कलकोट भक्तनिवासासाठी बुकिंग करताना सावधान ! सायबर फ्रॉडकडून होऊ शकते फसवणूक

 

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्टच्या भक्त निवासामध्ये खोली बुक करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोन सायबर चोरट्याना अटक केली आहे.अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट यांच्याकडे अशाप्रकारच्या १४ तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

याबाबतची माहिती अशी की माटुंगा येथील एका महिलेला तिच्या वृद्ध आईवडिलांना अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी न्यायचे होते. अक्कलकोट येथील भक्तनिवासातील खोली राहण्यासाठी बुक करायची असल्याचे त्याने गुगलची मदत घेतली. गुगलवर अक्कलकोट संस्थांनाचे नावे असलेली एक वेबसाइट तिला दिसली. तिने या वेबसाइटवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता फोनवरील व्यक्तीने सुशीलकुमार असे नाव सांगितले. महिलेला भक्त निवासाचे फोटो व्हॉट्सअॅपद्वारे पाठविले. त्यानंतर खोली बुक करण्यासाठी २,२०० रुपये ‘जीपे’मार्फत पाठविण्यास सांगितले.

वारंवार प्रयत्न करूनही पैसे जात नसल्याने सुशीलकुमार याने या महिलेकडून ओटीपी मागून घेतला. त्यानंतर टप्याटप्याने तिच्या खात्यावरून तीन लाख नऊ हजार रुपये वळविले. आपली फासवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीना ताब्यात घेतले. त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट यांच्याकडे अशाप्रकारच्या १४ तक्रारी आल्या आहे.

Team Global News Marathi: