अजून किती जणांना पक्षातून हाकलणार; आम्ही शिवसेनेतच – एकनाथ शिंदे

 

मुंबई | लोकसभेच्या शिवसेनेच्या प्रतोदपदावरुन खासदार भावना गवळी यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अजून किती जणांची पक्षातून हकालपट्टी करणार, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याची घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही शिंदे म्हणाले.

आम्ही यापूर्वी शिवसेनेत होतो, आजही शिवसेनेत असून, आम्ही शिवसैनिक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. कायदा आणि नियमाने आम्हाला आमचे पद दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात शिवसेना विरुध्द एकनाथ शिंदे यांच्यातील सामना अद्याप संपलेला नाही. लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या प्रतोद पदावरुन भावना गवळी यांची हकालपट्टी केल्याचा उल्लेख करुन शिंदे म्हणाले की, आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात. खा. शेवाळे यांनी राष्ट्रपती पदासाठी भाजप उमेदवाराला समर्थन देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र योग्य आहे.

राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला विराजमान होत असेल तर ती अभिमानाची बाब आहे, असे शिंदे म्हणाले. मोदी यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. त्याला पाठिंबा देणे हे योग्य आहे, असेही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर केल्याचे जाहीर केले. त्यानंतर एमआयएमने या नावाला विरोध केला आहे, याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था कुणाही हातात घेऊ नये. मग ती व्यक्ती खासदार असो की आमदार. सरकार अशा व्यक्तीवर कारवाई करेल असे ते म्हणाले.

Team Global News Marathi: