पुणे | पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे. प्रकरण असे की, राष्ट्रवादीच्या पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी रास्तवराडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका समोर असतानाही पक्षाच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाल्याने सोशल मीडियावरुन राष्ट्रवादीसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपा नेत्यांनी निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. भाजपा नेत्यांनीही आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांवर टीका केलीय.
पुण्यातील कार्यक्रमाला झालेली गर्दी टीकेची धनी होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे खुद्द अजित पवारांनी देखील आपणच नियम करायचे आणि मोडायचे हे काही पटत नव्हते असे सांगतानाच तुम्ही नियमांचे पालन केले नाही, अशी खंतही या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. मात्र, आता सोशल मीडियावर या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरुन, राष्ट्रवादीसह अजित पवार यांच्यावर नेटीझन्सही टीका करत आहेत. एकीकडे पुण्यात शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे, गर्दी टाळणे आणि सार्वजनिक कार्यक्रम न घेणे हे सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीतील कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याने महाविकास आघाडी सरकारवरही टीका होत आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन अतिशय साध्या पद्धतीने ऑनलाईन बैठक घेऊन साजरा केला. मात्र, दुसरीकडे अजित पवारांच्या उपस्थितीतील ही तोबा गर्दी कोरोनाचे संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळेच, विरोधकांनीही या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे.