आजोबांचे विचार वाचा म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचं प्रबोधनकारांच्या जयंती दिनी प्रत्युत्तर

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरे यांनी आंदोलन करत राज्यातील वातावरण ढवळून काढलं. त्यामुळे राज यांनी त्यांचे आजोबा दिवंगत प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचायला हवेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी लगावला होता.

आता या पार्श्वभूमीवर प्रबोधनकारांच्या जयंतीदिनीच त्यांचे हिंदुत्वाबाबतचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत राज ठाकरे यांनी आपल्या राजकीय विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. ते हिंदू संस्कृती, हिंदू धर्म याचे जाज्वल्य अभिमानी होते. त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्यांचं एक दुर्मिळ भाषण, मुद्दामून देत आहे. त्यांचे हे विचार जरूर ऐका,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप शेअर केली आहे.

‘हे भाषण एका ‘कृतिशील’ विचारवंताच आहे. माझ्या आजोबांचा धर्म ह्या कल्पनेला विरोध नव्हता, उलट ते कमालीचे हिंदू धर्माभिमानी होते. फक्त धर्माच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी, फसवेगिरी त्यांना रुचायची नाही, आणि असल्या भोंदूगिरी करणाऱ्यांवर ते हल्ला चढवत.

थोडक्यात आख्ख आयुष्य त्यांनी लोकांच्या मनातील धर्माची भीती काढून, धर्माबद्दल आस्था, प्रेम निर्माण व्हावं म्हणून वेचलं. या भाषणात त्यांनी नाठाळांवर वेळेस रट्टे ओढताना मागे पाहू नका असं आवाहन केलं आहे आणि हे करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत हे विसरू नका ह्याची आठवण करून दिली आहे,’ असं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Team Global News Marathi: