अहमदनगरचं नामांतर हा समाजात विष कालवण्याचा प्रयत्न, खा. सुजय विखेंचा पडळकरांना टोला

 

नगर | अहमदनगरच्या नामांतराची मागणी करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेशी त्यांच्याच पक्षाचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी असहमती दर्शविली आहे. एवढेच नव्हे तर कारण नसताना हा विषय उपस्थित करून समाजात विष कालविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा टोलाही सुजय विखे पाटील यांनी पडळकर यांचे नाव न घेता लगावला आहे.

अहमदनगरचे नाव अहिल्यादेवीनगर करावे, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर हालचालीही सुरू झाल्या आहेत. विधान परिषदेतही पडळकर यांना सकारात्मक उत्तर देण्यात आले होते. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यात या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव बदलावे किंवा विभाजन करावे अशी मागणी माझ्याकडे कोणीही, कधीही केली नाही. ही मागणी स्थानिक नागरिकांचीही नाही, असे विखे-पाटील यांनी म्हटले.

अहमदनगरमधील जनता जोपर्यंत याबाबत मागणी करत नाही तोपर्यंत जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीने नामांतराची मागणी करणे मला संयुक्तिक वाटत नाही. अहमदनगरची परंपरा वेगळी आहे. येथे समाजकारण आणि राजकारण अशी जोड देऊन काम केलेले अनेक नेते होऊन गेले. अहमदनगर जिल्हा हा संवेदनशील जिल्हा आहे. राज्याच्या राजकीय पटलावर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. सामाजिक सलोखा अनेक वर्षे या जिल्ह्याने टिकवून ठेवला आहे. अशा परिस्थितीत कारण नसताना काही लोक यात विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांने ते बंद करावे, अशी माझी विनंती आहे, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: