सरनाईकांच्या पत्रानंतर विजय (बापू) शिवतारेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, पुण्यातील काँग्रेस आमदारावर केला गंभीर आरोप

 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी काँगेस आमदाराची तक्रार थेट मुख्यामंत्र्यांना केली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेस आमदारावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शिवतारेंनी गंभीर आरोप केले आहेत. विजय शिवतारे यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर हवेली मतदारसंघाचे आमदार संजय जगताप यांच्यावर श्रेयवादाचा आरोप केला आहे.

ते आपल्या पत्रात म्हणतात की, राज्यमंत्रिपदाच्या काळात मोठ्या मेहनतीतून मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली आहे.

मात्र, या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम कॉंग्रेसचे स्थानिक आमदार संजय जगताप यांच्याकडून केले जात आहे. तोंडल येथे काम सुरु केल्यानंतर अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते” असा गंभीर आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. यावर आता काँग्रेस काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: