आदित्य ठाकरेंनी उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात गेला वाहून

 

नाशिक : तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी उभारलेला शेंद्री पाडा येथील लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून पाण्याची हंडे घेऊन जाण्याची कसरत करावी लागत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी सुरगाणा परिसरात पाणीटंचाईंचे भीषण वास्तव समोर आले होते. त्र्यंबक तालुक्यातील शेंद्री पाडा येथील लाकड्या बल्ल्यावरून महिलांचा हंडे घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

सदर व्हिडिओ थेट तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचला होता. त्यांनी या व्हिडिओची दखल घेत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन लोखंडी पूल उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी आदित्य ठाकरे हे स्वतः या पुलाच्या उद्घाटनासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पोहोचले होते.

दरम्यान मागील 10 दिवसात नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबक तालुका, इगतपुरी तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आणि याच पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा जीवघेणी कसरत करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वीच माध्यमांनी घटनास्थळी जाऊन हा पुल पुराच्या पाण्यात पाण्याखाली गेल्याचे चित्र मांडले होते. त्यानंतर आज हा पुलच वाहून गेल्याने पुन्हा लाकडी बल्ल्यावरून प्रवास करावा लागत आहे.

“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव पुरतं घालवलं, सुप्रीम कोर्टातही इज्जत गेली”

शिंदे गटात सामील झालेले खासदार सदाशिव लोखंडे यांच्या तोंडाला फासले काळे

Team Global News Marathi: