साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले !

 

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी या वादावर या दोन्ही राजांनी पडदा टाकला होता. मात्र आता दुसरीकडे या दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त साताऱ्यातून समोर येत आहे.

वाहन लावण्याच्या कारणावरून पोलीस करमणूक केंद्रासमोर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी रात्री मोठा राडा झाला. या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमांखाली सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस करमणूक केंद्र शांतता कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीला आजी माजी नगरसेवक, गणेश मंडळाचे कार्यकर्ते व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.खासदार उदयनराजे भोसले समर्थक सनी भोसले यानं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली होती.

कार्यालयासमोर गाडी का लावली या वादावरून नगरसेवक खंदारे यांच्या समर्थकांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे संबंधित युवकाने त्याची गँग बोलावून तेथेच राडा केला. या राड्यात सहा जण गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची सातारा शहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

Team Global News Marathi: