राज्यात तीन दिवस पुरेल इतका कोरोना लसीचा साठा उपलब्ध, राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मिनी लॉकडाऊन जाहीर केलेला असताना दुसरीकडे युद्ध पातळीवर लसीकरणाला सुरवात झालेली मात्र आता संपूर्ण राज्याला तीनच दिवस पुरेल एवढा कोरोना व्हॅक्सिनचा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे.

मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी लसीकरण, ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच अतिरिक्त साठ्याची मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं आहे. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं. आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नाही असं सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे,’ अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

लसीकरण करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. जर एखादा रामबाण उपाय असेल तर आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लसीकरण महत्वाचा मार्ग आहे. लसीकरण मोफत आणि सुरक्षित आहे. पण लस मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी पोटतिडकीने विनंती केली आहे. खासकरुन कोव्हॅक्सिन द्या अशी मागणी केली आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: