अभिमास्पद: जिद्द असावी तर हृदयेश्वर सारखी ; वाचा सविस्तर-

प्रतिनिधी : निकिता शिंदे  अभिमास्पद: जिद्द असावी तर हृदयेश्वर सारखी ; वाचा सविस्तर-

हृदयेश्वर सिंह भाटी. वय वर्षं 18. वयाच्या चौथ्या वर्षी एक दिवस अचानक चालता चालता तो पडला. मग समजला त्याला जन्मतः असलेला ड्यूशिन मस्कुलर डिस्ट्रोफी नावाचा आजार. आयुष्यं बघताबघता व्हीलचेअरवर आलं. शरीर 80 % लकवाग्रस्त झालेलं. शरीर म्हणून वाट्याला फक्त थरथरणारी बोटं, आणि अत्यंत कुशाग्र बुद्धी सोबतीला होती.

वाट्याला आलेलं परावलंबी जीवन बघून आपल्यासारख्या एखाद्यानं हाय खाल्ली असती. पण हृदयेश्वरनं आपल्या वाट्याला आलेल्या त्याच थरथरत्या बोटांच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर एक खेळ शोधून काढला. सोंगट्या गोलाकार ठेऊन सहा जणांत खेळता येणारा बुद्धिबळाचा खेळ.

आणि वयाच्या 9व्या वर्षी 3 पेटंट स्वतःच्या नावावर करून देशातला सर्वात कमी वयाचा पेटंटधारक बनला. जगातला सर्वात लहान दिव्यांग पेटंटधारकही आहे तो.

आज त्याने बनवलेल्या ‘पॉवर व्हील चेअर ऍक्सेसीबीलिटी व्हेईकल मेकॅनिझम’ जगातल्या हजारो व्हीलचेअरवरचं आयुष्यं जगणाऱ्या लोकांना मदत करत आहे.
कालच त्याला मा. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं.

आयुष्यात बऱ्याच वेळी आपल्याला पूर्णतः असहाय्य वाटू लागतं, पूर्णतः पराभूत झाल्यासारखं वाटतं…ज्याक्षणी सर्वकाही संपतंय की काय अशी अनामिक भीती वाटु लागती, आणि पुढचा मार्ग अस्पष्ट होईल…दिसेनासं होऊ लागतं.

तेव्हा…जरासुध्दा कच न खाता, माघार न घेता फक्त हृदयेश्वर सारख्या नीडर लढवय्यांकडे बघावं. नव्या दमानं, नव्या उमेदीनं, नव्या उत्साहानं तो तुम्हाला जगण्याचं नवं बळ देईल, कारण आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव ह्या गोष्टी पण गरजेच्या असतात. त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो आपल्यातलाच खंबीर आणि अभेद्य माणुस.

कारण जीवनात येणारी प्रत्येक वादळं, संकटं, अडचणी ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठीच नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठीही असतात…

– अनुप देवधर ©
(रिपोस्ट)

ग्लोबल न्युज नेटवर्क: