शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला, तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकताच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप पाहायला मिळाला.
राज्याच्या राजकारणात जिकडे-तिकडे याचीच चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही धनुष्यबाणाचीच चर्चा रंगली आहे. शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. तर, महाविकास आघाडीतील नेतेही भूमिका मांडत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन शिवसेनेचं समर्थन केलं आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या प्रकरणाबाबतची निवडणूक आयोगासमोरील पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी, १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
मात्र, शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेचे नेते आपली बाजू मांडत आहेत. तर, महाविकास आघाडीतील नेते शिवसेनेच्या बाजूने भूमिका घेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन शिवसेना चिन्ह गोठवल्यानंतर आपलं मत मांडलं आहे. ‘लोकांच्या मनताील निष्ठा गोठवता येणार नाही”, असे म्हणत पवार यांनी ठाकरे यांना समर्थन दर्शवलं आहे.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही. दसरा मेळाव्यात दिसलेली निष्ठा निवडणुकांमध्येही निश्चित दिसेल, असे ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचं समर्थनच केलं आहे.