…आता महाराष्ट्रालाच उठाव करावाच लागेल ; सीमावादावरून संजय राऊतांचा इशारा

 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. यावरून राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून त्यावर भाष्य केले आहे. अग्रलेखात म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणारे हे सरकार सीमा प्रश्नाला, मराठी बांधवांना न्याय देईल असे वाटत नाही.

आता महाराष्ट्रालाच उठाव करावा लागेल. 20 लाख मराठी बांधव कानडी जोखडात गेल्या 50-60 वर्षांपासून अडकून तडफडत आहेत.त्यांची बाजू मांडणाऱ्यांना तुरुंगात टाकू, मुस्कटदाबी करू, अशा धमक्या महाराष्ट्राचे मंत्री शंभुराजे देसाई व भाजप अध्यक्ष बावनकुळे देत असतील तर महाराष्ट्राने गुडघे टेकले असून सीमाभागाचा सौदा या लोकांनी केला आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे आता महाराष्ट्रालाच उठाव करावा लागेल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात फडणवीस-शिंदे सरकारच्या अब्रूचे सपशेल दिवाळे वाजले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले. पण ही उग्रता फक्त कर्नाटकच्या बाजूने दिसत आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे मिंधे सरकार तोंडास कुलूप लावून बसले आहे. आधी शिवरायांच्या अपमानावर तोंडास कुलूप व आता सीमाप्रश्नी पडखाऊ धोरण, हे बरे नाही. कन्नड रक्षण वेदिकेने बेळगावात महाराष्ट्रातून गेलेल्या वाहनांवर हल्ले केले. त्याच वेळी बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरणच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक सरकारने अटक करून तुरुंगात डांबले. हा अत्याचार आहे.

बेळगावात मराठी लोकांवर आणि त्यांच्या मालमत्तांवर हल्ले सुरूच आहेत. यावर शरद पवार यांनी जोरकस भूमिका घेतली आहे. ”चोवीस तासांत हे हल्ले थांबवा, अन्यथा मला पुढच्या 48 तासांत बेळगावच्या नागरिकांना धीर द्यायला जावे लागेल. महाराष्ट्रातील जनतेची भूमिका अजूनही संयमाची आहे. त्या संयमाला मर्यादा येऊ नये अशी मनापासून इच्छा आहे.” अशा शब्दांत पवार यांनी महाराष्ट्राच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. त्यावर उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘पवारांनी बेळगावात जायची गरज नाही.” फडणवीसांनी हे सांगणे त्यांच्या सोयीचे आहे.

सरकारातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील व शंभुराजे देसाई हे चार दिवसांपूर्वी बेळगावाला निघाले, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम भरताच मागे फिरले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘वाद वाढवू नये.’ उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बेळगावात जाऊ नका. मग महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, सीमा भागाचे, मराठीजनांचे धिंडवडे निघत असताना मूर्खासारखे बघत राहायचे काय? रात्रीच्या अंधारात लपत छपत, काय तर म्हणे गनिमी काव्याने चाळीस आमदारांचे पार्सल खोके सुरतला पाठवणारे शिंदे सरकार दोन मंत्री बेळगावात पाठवू शकले नाही, असा घणाघात राऊत यांनी अग्रलेखातून केला.

Team Global News Marathi: