आमदार साळवींच्या पीएची होणार चौकशी, लाजलुचपत विभागाने धाडली नोटीस

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नेत्यांनाही केंद्रीय तपस यंत्रणांनी नोटीस बजावल्या होत्या तसेच चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या अनेक नेत्यांना जेलची हवा सुद्धा खावी लागली होती अशातच आता शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा सेना नेत्यांच्या मागे चौकशीच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत, अशातच आता ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे.

आमदार साळवी यांचे स्वीय सहायक सुभाष मालप यांनाही मालमत्ता चौकशीबाबत रायगड लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवली आहे.गुरुवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश नोटीसद्वारे मालप यांना देण्यात आले होते. मात्र मालप हे चौकशीला गैरहजर राहिले. स्वीय सहायक यांनाही नोटीस आल्याने आमदार साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.रायगड लाचलुचपत विभागाने साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्तेबाबत चौकशी सुरू केली आहे.

२० जानेवारी रोजी आमदार साळवी यांची सहा तास अलिबाग येथे लाचलुचपत कार्यालयात चौकशी झाली होती. यावेळी साळवी यांनी चौकशीला सहकार्य केले असून, काही कागदपत्रांची मागणी विभागामार्फत केली आहे.ही माहिती १० फेब्रुवारीला आमदार साळवी यांना सादर करायची आहे. तत्पूर्वीच साळवी यांचे स्वीय सहायक मालप यांनाही मालमत्तेबाबत चौकशीला हजर राहण्याबाबत दोन दिवसापूर्वी नोटीस पाठवली होती.

Team Global News Marathi: