आमदार राजन साळवी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन, पोस्टरवर जोडे मारले

 

बारसू-धोपेश्वर येथील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंतयांनी बैठक घेतल्यानंतर आता कोकणातील वातावरण तापू लागले आहे. कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला पाठिंबा दर्शवणारे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात स्थानिकांनी तीव्र आंदोलन केले.

उद्योग मंत्री उदय सामंत हे दिशाभूल करत असून ग्रामस्थांचा रिफायनरीला विरोध असल्याचे रिफायनरी विरोधी आंदोलकांनी सांगितले. कोकणात, पर्यावरणपूरक प्रकल्प आणण्याची मागणीदेखील यावेळी स्थानिकांनी केली. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीला आमदार साळवी हजर राहिले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले. आता, त्याचे पडसाद आता कोकणातल्या रिफायनरी होणाऱ्या गावांमध्ये दिसू लागले आहेत.

साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर या भागातील महिलांनी बुधवारी संध्याकाळी एकत्र येत आंदोलन केले. आंदोलक महिलांनी राजन साळवी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले. तर फोटोवर शेण फेकून मारले. यावेळी आमदार राजन साळवी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीती कोकणचा विनाश करणारा प्रकल्प आणू देणार नसल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.

आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना रिफायनरीबाबत दिलेले निवेदन ट्वीट केले आहे. कोकणात रिफायनरीच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून लोकांमधील गैरसमज दूर करावे असे त्यांनी म्हटले. रिफायनरीविरोधी आंदोलकांवर निशाणा साधताना त्यांनी काही समाजविघातक संस्थांनी प्रकल्पविरोधात खोटा अपप्रचार केल्याने प्रकल्पविरोधी वातावरण असल्याचे साळवी यांनी नमूद केले.

Team Global News Marathi: