आमदार अमाेल मिटकरी यांच्या विरोधात इस्लामपूर न्यायालयात फिर्याद दाखल

 

राष्ट्रवादीचे आमदार अमाेल मिटकर यांनी जाहीर सभेत हिंदू धर्माचा अवमान केल्याप्रकरणी येथील ॲड. विद्याधर कुलकर्णी यांनी इस्लामपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. ७ सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. आता या सुनवाईमुळे अमोल मिटकरी यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवार संवादयात्रेत मिटकर यांनी २१ एप्रिल २२ रोजी इस्लामपूरच्या जाहीर सभेत हिंदू विवाह धर्मपरंपरा व चालीरीतीपैकी कन्यादान या विधीची टिंगल उडवली. यामध्ये कुठेही विवाह लावणारे पुरोहित वधू किंवा वराचा हात हातामध्ये घेत नाहीत.

‘मम भार्या समर्पयामी’ असा मंत्र किंवा संकल्पही विधीमध्ये नाही. तरीदेखील जाहीर सभेत टिंगल करत मिटकरी यांनी हिंदू धर्मावर विश्वास असणाऱ्या व हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच जाती-धर्मामध्ये तेढ उत्पन्न करणारे असे हे त्यांचे वक्तव्य आहे.

या जाहीर सभेमध्ये विवाह विधी, कन्यादान या विषयाचा कोणताही संबंध नसताना, ही राजकीय सभा सुरू असताना मुद्दामहून हा विषय काढून मिटकरी यांनी हिंदू धर्मातील एका उच्च परंपरेची टिंगल केली आहे. त्यांनी भा.दं.वि. कलम २९५ अ प्रमाणे गुन्हा केला असल्याने त्यांना कठोर शासन व्हावे, असे ॲड. कुलकर्णी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Team Global News Marathi: