अबब..मुंबई महापालिकेची यंदा रेकॉर्डब्रेक इतक्या हजार कोटींची मालमत्ता कर वसुली

अबब..मुंबई महापालिकेची यंदा रेकॉर्डब्रेक 5 हजार 792 कोटींची मालमत्ता कर वसुली! कर संकलनात 700 कोटींची वाढ

मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 700 कोटी रुपयांची वाढ झाली असून 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 5 हजार 792 कोटी 22 लाख 50 हजार रुपये इतके कर संकलन नोंदविण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या इतिहासातले आजपर्यंतचे हे विक्रमी करसंकलन ठरले आहे. विशेष म्हणजे 1 जानेवारी 2022 पासून मुंबईत 500 चौरस फूटापर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. तरीही कर संकलनात झालेली घसघशीत वाढ पाहता करनिर्धारण व संकलन खात्याची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे 24 पैकी 3 प्रशासकीय विभागांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 30 टक्क्यांहून अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. यात जी/दक्षिण विभागाने 34.34 टक्के इतकी वाढ नोंदवून अग्रस्थान पटकावले आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे विविध व दर्जेदार अशा नागरी सेवा-सुविधा दिल्या जातात. याअनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा अत्यंत महत्त्वाचा स्रोत म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो. संबंधित नागरिकांनी वेळेत महानगरपालिकेकडे मालमत्ता कर जमा करावा, यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशाखाली महानगरपालिका प्रशासन मागील वर्षभर सातत्याने प्रयत्नशील होते.

या अनुषंगाने सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन) सुनील धामणे, सहायक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास मोटे व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातत्याने नियोजन व आढावा बैठकांचे आयोजन केले. या नियोजनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही व आवश्यक तेथे सक्त कारवाई यांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात आली. परिणामी 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही रुपये 5,792.22 कोटी इतकी झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा कर संकलन 700 कोटी 93 लाख 63 हजार रुपयांनी म्हणजेच 13.77 टक्क्यांनी वाढले आहे. यंदाची कर वसुली महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. या कामगिरीबद्दल करनिर्धारण व संकलन खात्यातील अधिकारी – कर्मचारी आणि विभाग स्तरावर कामकाज करणारे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले जात आहे.

मागील 2 वर्षांपासून कोविड विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे जनजीवनाला आणि अर्थव्यवस्थेला निरनिराळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, या आव्हानावर यशस्वीपणे मात करुन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वाढत्या संख्येने मालमत्ता कर संकलन करुन आपले नाणे खणखणीत सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, मुंबई महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फूट (46.45 चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती / निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 पासून ही सवलत लागू करण्यात आली आहे. एकूण 16 लाख 14 हजार निवासी सदनिकाधारकांना त्याचा लाभ झाला आहे. सवलतीचा हा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवत आणि कर संकलनावर कोणताही विपरित परिणाम न होवू देता महानगरपालिका प्रशासनाने आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे.

मागील 2 आर्थिक वर्षांशी तुलना – आधीच्या 2 आर्थिक वर्षांचा विचार करता, गतवर्षी म्हणजेच 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुली ही रुपये 5 हजार 091 कोटी इतकी झाली होती. तर, त्याआधी म्हणजेच 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुली ही रुपये 4 हजार 161 कोटी इतकी झाली होती, अशी माहिती सह आयुक्त सुनील धामणे यांनी दिली आहे.

शहर, पूर्व व पश्चिम उपनगर निहाय – आर्थिक वर्ष दिनांक 1 एप्रिल, 2021 ते 31 मार्च, 2022 या कालावधीतील मालमत्ता कर वसुली कामगिरीचा विस्ताराने विचार केल्यास कर वसुलीत सर्वाधिक वाढ ही शहर विभागामध्ये म्हणजे 17.51 टक्के इतकी झाली आहे. गतवर्षी शहर विभागात 1,496.10 कोटी रुपये कर प्राप्त झाला होता. तर यंदा 1,758.20 कोटी रुपये करसंकलन झाले आहे. म्हणजेच 262.03 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पूर्व उपनगरांमध्ये गतवर्षी 1,070.71 कोटी रुपये इतकी मालमत्ता कर वसुली झाली होती. तर यंदा 1,188.16 कोटी रुपये कर जमा झाला आहे. एकूण 117.44 कोटी रुपयांची अर्थात 10.97 टक्के इतकी वाढ झाली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये गतवर्षी 2,522.38 कोटी रुपये कर मिळाला होता. तर यंदा 2,840.04 कोटी रुपये कर महानगरपालिकेकडे जमा झाला आहे. ही वाढ 317.65 कोटी रुपयांची अर्थात 12.59 टक्के इतकी आहे.

प्रशासकीय विभाग निहाय – महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण 21 विभागांनी गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक कर संकलन केले आहे. पैकी, जी/दक्षिण विभागाने सर्वाधिक 34.34 टक्के, त्याखालोखाली एफ/उत्तर विभागाने 32.92 टक्के तर पी/दक्षिण विभागाने 33.71 टक्के इतकी वाढ गतवर्षाच्या तुलनेत केली आहे. त्यापाठोपाठ एच/पश्चिम 27.93 टक्के, एच/पूर्व विभागात 24.30 टक्के आणि एफ/दक्षिण विभागात 23.70 टक्के अधिक कर संकलन झाले आहे. एवढेच नव्हे तर शासकीय मालमत्ता कर वसुलीत देखील यंदा 188.62 टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात 2.01 कोटी रुपये शासकीय मालमत्ता कर संकलन झाले होते. तर यंदा 5.81 कोटी रुपये म्हणजे 3.80 कोटी रुपये इतके अधिक कर संकलन झाले आहे.

प्रसंगी सक्त कारवाई – मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांनी त्यांचा मालमत्ता कर वेळेत महापालिकेकडे जमा करावा, यासाठी यंदा महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या नेतृत्त्वात सातत्याने नियोजन व आढावा घेण्यात येत मालमत्ता कर वसुलीसाठी विविध स्तरीय कारवाई करण्यात आली. वारंवार विनंती करुनही व नोटीस देत मालमत्ता कर रकमेचा भरणा महानगरपालिकेकडे न करणाऱ्या 5 हजार 821 मालमत्तेवर अटकावणीची (Property Attachement) कारवाई करण्यात आली. तर, 101 जल जोडण्या खंडीत करण्यात आल्या. त्यासोबत आवश्यक तिथे वाहने, वस्तू यासारखी जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई देखील करण्यात आली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: