अवघ्या 35 पैशांच्या शेअरने अडीच वर्षात केलं 4 कोटींचा मालक

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (Investment) करणं हा जुगार असल्याचा गैरसमज असल्यानं आपल्या देशात फार कमी जण यात गुंतवणूक करतात. शेअर बाजारात अगदी कमी कालावधीत प्रचंड परतावा (Return) मिळू शकतो; मात्र त्यात जोखीमही अधिक असते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस याकडे वळत नाही; पण शेअर बाजारात योग्य अभ्यास करून गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होते.

अगदी अल्प रकमेतली गुंतवणूकही लाखो रुपयांचा फायदा देऊन जाते. शेअर बाजारातली गुंतवणूक फायदेशीर करायची असेल तर महागातले शेअर्स घ्यावे लागतात अशीही काहींची समजूत असते; पण असे काही नसते. काही वेळा शेअर बाजारात अगदी किरकोळ किमतीचा शेअरही आकाशाला भिडतो आणि गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकतो. अशा अगदी किरकोळ किमतीच्या शेअरला पेनी शेअर (Penny Share/Stock) म्हटलं जातं. नुकतंच एका पेनी शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं असून, यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. त्यामुळे 2021 मधल्या मल्टीबॅगर शेअर्सच्या (MultibaggeR) यादीमध्ये स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप क्षेत्रातल्या शेअर्ससह या पेनी शेअरचाही समावेश झाला आहे. मल्टीबॅगर शेअर म्हणजे अनेक पटींनी परतावा देणारा शेअर.

हिंदी एशियानेट’नं दिलेल्या वृत्तानुसार, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा हा शेअर आहे फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिकचा (Flomic Global Logistic). गेल्या वर्षभरापासून या शेअरचा आलेख चढताच राहिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचं मूल्य 18.80 लाख रुपये झालं असतं. गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये वर्षभरापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याची किंमत 1.17 कोटी रुपये झाली असती. त्याचप्रमाणे, गुंतवणूकदाराने अडीच वर्षांपूर्वी 35 पैसे किंमत असताना यात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचं मूल्य आज 4.09 कोटी रुपये झालं असतं.

गेल्या सहा महिन्यांत फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअरची किंमत 7.62 रुपयांवरून 143.25 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या कालावधीत कंपनीच्या शेअरच्या किमतीत तब्बल 1780 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021पर्यंत या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 7245 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने सुमारे 11,640 टक्के कमाई करून दिली आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत प्रति शेअर फक्त 1.22 रुपये होती.

अडीच वर्षांपूर्वी म्हणजेच 28 मार्च 2019 रोजी मुंबई शेअर बाजारात (BSE) हा शेअर 35 पैसे किमतीवर बंद झाला होता. आता तो 143.25 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 40,830 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सुमारे तीन आठवड्यांपूर्वी हा शेअर 216.30 रुपयांवर होता. तज्ज्ञांच्या मते, कंपनीच्या शेअर्समध्ये आगामी काळात आणखी चांगली वाढ दिसून येईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: