कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून मुंबई पोलीस ठाण मांडून बसले असून पोलिसांनी ढोलगरवाडी येथील एका फार्म हाऊसवर छापा टाकला असून गेल्या तीन दिवसांपासून याठिकाणी शोध मोहीम सुरू आहे.७२ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ढोलगरवाडी गावातून एकाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून कोट्यवधींचा माल जप्त करण्यात आला आहे.
संबंधित कारवाईबाबत पोलिसांनी सुरुवातीपासूनच कमालीची गुप्तता बाळगली होती. तीन दिवस झडती घेतल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ढोलगरवाडीतील एका फार्महाऊसवर पशुपालनाच्या आड एमडी नावाचा ड्रग्स तयार करण्याचा कारखाना सुरू होता. या प्रकरणात एका हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अलीकडेच, मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषन विभागाकडे एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संबंधित महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथील फार्म हाऊसवर एमडी नावाचा अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी ढोलगरवाडी येथील संबंधित फार्म हाऊसवर छापा टाकला. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई पोलीसांनी याठिकाणी शोधमोहीम राबवली असून हाय प्रोफाइल ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.