५६ इंची सरकार थडग्यातल्या औरंगजेबाला इतकं घाबरतं?

 

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असतानाच आता भारतीय पुरातत्व विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खुलताबाद येथील औरंगजेब समाधीवर विवाद सुरु असल्यामुळे दिल्ली येथील भारतीय पूरातत्व विभागाने याची गंभीर दखल घेऊन पत्र काढले आहे. यानुसार कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून बुधवार (18 मे) पासून पाच दिवसांसाठी औरंगजेब मकबरेचं मुख्यद्वार पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी एक लक्ष्यवेधी पोस्ट फेसबुकवर केली आहे. यात त्यांनी भाजप सरकारवर नेहमीप्रमाणे हल्लाबोल तर केलाच आहे मात्र त्यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत. ते म्हणतात,आजपासून औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद करण्याचा चमत्कारिक निर्णय भारतीय पुरातत्व विभागानं घेतला आहे ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. आधी हे स्पष्ट केलं पाहिजे की मी औरंगाबादेत विद्यार्थी असतांना ती कबर पाहिलेली आहे.

मात्र चादर वगैरे चढवलेली नाही किंवा भक्तिभावानं नमस्कार सुद्धा केलेला नाही. पण तो एक ऐतिहासिक वारसा आहे हे कशासाठी नाकारायचं? स्वराज्याचा शत्रू होता पण आयुष्याची महत्वाची तब्बल २७ वर्ष औरंगजेबानं मराठी देशी काढली, हा इतिहास थोडाही महत्वाचा नाही का? आणि अशांतता होते म्हणून पुतळे, समाध्या बंद करायच्या असतील तर तुम्हाला या देशातल्या महापुरुषांचे पुतळे आणि समाध्या बंद कराव्या लागणार आहेत का? इतिहासापासून शिकावं, समजूतदार व्हावं हे ठीक पण इतिहासापासून पळून जावं हे कितपत योग्य आहे? आणि त्यात शहाणपण ते काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

औरंगजेबाची कबर हाही इतिहासाचा वारसा आहे. तो सरकार संरक्षित करू शकत नसेल तर हे केंद्र सरकार फारच दुर्बल आहे असं म्हणलं पाहिजे किंवा स्वतःला आवडत नसलेला इतिहास मारण्याची कावेबाजी असं म्हणलं पाहिजे. आणि पुरातत्व विभाग काय काय बंद करणार हाही विषय आहेच. ५६ इंची सरकार थडग्यातल्या औरंगजेबाला इतकं घाबरतं? असा सवाल देखील चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: