नांगरे-पाटील यांच्यासह डझनभर वरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह, 104 पोलीस रुग्णालयामध्ये
मुंबई पोलीस दलातील 486 अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू
ओमायक्रोनचा संसर्ग झपाटय़ाने पसरू लागला असून पोलीस दलातही त्याचा शिरकाव झाला आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह डझनभर वरिष्ठ अधिकारी पाँझिटिव्ह सापडले आहेत. तर आज 104 पोलिसांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असून सर्वांची प्रकृती चांगली आहे.
नांगरे-पाटील यांच्याव्यतिरिक्त अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, संदीप कर्णिक, सत्यनारायण चौधरी तसेच उपायुक्त डॉ. हरी बालाजी, गीता चव्हाण, सोमनाथ घार्गे, विशाल ठाकूर, दत्ता नलावडे, प्रकाश जाधव, शिवाजी राठोड, नितीन पवार, सुनील भारद्वाज हे अधिकारी आजारी असून होम आयसोलेशनमध्ये आहेत.
दरम्यान, मुंबई पोलीस दलातील 486 अधिकारी, कर्मचारी ऑक्टिव्ह पेशंट असून त्यातील 104 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या 6, दुसरा डोस घेतलेल्या 41 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 25 पोलिसांना दुसऱ्यांदा लागण झाली आहे.
देवनार पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रावू रेडेकर (57) आणि एमटी विभागातील सहाय्यक फौजदार महेंद्रराज भाटी (57) यांचे कोरोनाने शुक्रवारी निधन झाले. निवृत्तीच्या उंबरठय़ावर असतानाच कोरोनाने दोघांना गाठले. रेडेकर हे शुक्रवारी पोलीस ठाण्यात असताना त्यांना पाठदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना शताब्दी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथे औषधोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मुलाने त्यांना चेंबूरच्या शताब्दी रुग्णालयामध्ये नेले. तेथून त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथे त्यांची कोविड टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. दरम्यान, आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
तर आज पहाटे महेंद्रराज भाटी यांचा कोरोनाने मृत्यू झाला. भाटी रात्रपाळीला असताना त्यांना रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला.