सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री होण्यासाठी आत्ताही दावा करू शकतो, असे मोठे विधान त्यांनी केले. अजित पवारांच्या या विधानानंतर सत्ताधारी नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही त्यावर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले की, अजितदादा यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनुभवी नेते आहेत. अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते, असं सांगतनाच लायकी नसताना काही लोक मुख्यमंत्री झाले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. ठाकरे गटाची उद्या जळगावात सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या सभेला संबोधणार आहेत. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत जळगावात आलेले असता आम्ह्द्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांची मुलाखत ऐकली नाही. काय आहे त्यात मला माहीत नाही. मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही? त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे. अनेक वर्ष मंत्री आहेत. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते आपण मुख्यमंत्री व्हावे. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करून, तोडफोड करून मुख्यमंत्री झाले. एखाद्याच्या नशिबात असेल तर होत असतात. माझ्या अजितदादांना शुभेच्छा आहे, असे संजय राऊत म्हणाले.