एसटीला १ हजार कोटींचे पॅकेज; कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देणार तिन्ही महिन्यांचे वेतन : अनिल परब

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे तिन्ही महिन्याचे पगार दिवाळीपूर्वी दिले जाणार अशी घोषणा केल्यामुळे अखेर एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यांत बैठक झाली. राज्य सरकारने या बैठकीत परिवहन महामंडळाला एक हजार कोटींचे पॅकेज मंजूर केल्यामुळे आता परिवहन महामंडळाला आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होणार आहे.

याबाबत अनिल परब म्हणाले की, एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न खूप गंभीर होता. कोरोनामुळे झालेली महामंडळाची आर्थिक परिस्थिती पाहता पैशांची जमवाजमाव करणे कठीण होते. वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. गेल्या तीन महिन्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकित होते. त्यापैकी एका महिन्याचा पगार दिवाळीसाठी काल देण्यात आला.

आज यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाली. नेहमी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न उभा होतो, म्हणून आज अजित पवारांकडे मी सहा महिन्यांसाठी पॅकेज द्या अशी मागणी केल्यानंतर एसटीला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना तिन्ही महिन्याचे वेतन देणार आहोत. याबाबतची फाईल आज पुढे पाठवली असून कर्मचाऱ्यांना दोन दिवसात पगार मिळेल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचे वेतन, असे एकूण थकीत दोन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. हे तात्पुरते संकट आहे, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती अनिल परब यांनी केली होती. ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती. सोमवारी एका तासात एक पगार आणि सणाची आगाऊ रक्कम देण्यात येईल, अशी माहिती परब यांनी दिली.

दरम्यान, या प्रकारावरून भाजपने अनिल परब यांच्यावर टीका केली होती. राज्य सरकारतर्फे मोठ्या रक्कमेची अपेक्षा परिवहन मंडळाला आहे, त्यानंतर हा प्रश्न सुटेल कृपया आत्महत्या करू नका, असे आवाहन परब यांनी कर्मचाऱ्यांना केले होते. दोन महिन्यांचा पगार आणि सानुग्रह अनुदान आजच देणार आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासनही परब यांनी काल दिले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: